औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने शहरातील विकास कामे खोळंबली आहेत. कंत्राटदाराची बिले अदा न केल्याने प्रशासनाऐवजी महापौर नंदकुमार घोडेले यांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी महापौर मनपाच्या तिजोरीत भरणा करण्यासाठी स्वतः मालमत्ताधारकांच्या दारात जाऊन वसुली करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे आता महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला आदेश द्यायचे की स्वतःच वसुली करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र महापौर स्वतः वसुलीसाठी फिरत असल्यामुळे थकबाकीदारांनी तत्काळ रक्कम अदा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पहिल्या दोन दिवसांमध्ये १ कोटी १९ लाख रुपये तर बुधवारी ७३ लाख १४ हजार रुपयांची वसुली करण्यात मनपाला यश आले आहे.
अधिकारी ना महापालिकेत ना फिल्डवर
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक हे मुख्यालयात
अनेकदा गैरहजर असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणताही वचक राहिलेला नाही.
त्यामुळे हे अधिकारी नावाला आपली हजेरी मुख्यालयात लावून दिवसभर गायब असतात.
कार्यालयातील आपल्या दालनातही नाही आणि प्रत्यक्ष वसुलीसाठी फिल्डवरही नाही. मग हे
अधिकारी दिवसभर असतात कुठे याचा शोध घेण्याची नामुष्की आता महापालिकेच्या जबाबदार
अधिकाऱ्यांवर आली आहे. दोन दिवसांत सुमारे एक कोटीच्यावर थकबाकी मनपाच्या झोन
कार्यालयांनी वसुल केली. दरम्यान, या वसुली सप्ताहासाठी महापौरांनी नोडल ऑफिसरसह
प्रत्येक झोन निहाय एक असे नऊ नियंत्रण अधिकारी नियुक्त करुन त्यांच्याकडे थकीत कर
वसुलीची जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले होते.
‘मीच कुठे कुठे
लक्ष द्यायचे’, महापौरांचा सवाल
महापौरांनी नोडल ऑफिसरच्या नियुक्तीचे आदेश
दिल्यानंतरही प्रशासनाने तीन दिवसानंतरही त्यांच्या नियुक्तीचे पत्र काढले
नसल्यामुळे एकही नियंत्रण अधिकारी झोन कार्यालयात फिरकला नव्हता. महापालिका
प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका स्वतः महापौर नंदकुमार घोडेले यांना बसत आहे. "मीच
कुठे कुठे लक्ष द्यायचे" असा सवाल त्यांनी केला आहे. प्रशासनाला आदेश
देण्याऐवजी महापौर घोडेले यांना स्वतः वसुलीला फिरण्याची वेळ यावी यासारखे दुर्दैव
कोणेते, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. झोन निहाय नियुक्त
अधिकाऱ्यांनी जर यापुढे कामात दिरंगाई केली तर त्यांना आयुक्तांमार्फत नोटीस
बजावून कारवाई करण्याचा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला आहे.












